होम लोन बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे काय?
Home Loan Balance Transfer म्हणजे तुमचं चालू असलेलं कर्ज जिथे घेतलं आहे (म्हणजे NBFC-1) तिथून दुसऱ्या बँकेत (NBFC-2) हलवणं. हे करणं त्यावेळी फायदेशीर ठरू शकतं, जेव्हा दुसरी बँक कमी व्याजदरात कर्ज देत असते.
उदाहरणार्थ, अन्याने २० वर्षांसाठी ९% व्याजदराने कर्ज घेतलं होतं. त्याचा मित्र मन्या सांगतो की दुसऱ्या NBFC मध्ये त्याला ८.५% व्याजदर मिळू शकतो. अशा वेळी जर बाकीचे अटी योग्य वाटल्या, तर अन्याने त्याचं कर्ज ट्रान्सफर केल्यास व्याजात बचत होईल.
बँका वेगवेगळे व्याजदर का लावतात?
प्रत्येक बँकेच्या खर्चांची रचना वेगळी असते. जसं की, काही बँकांचे ऑफिसेस महागड्या ठिकाणी असतात (उदा. BKC, मुंबई) त्यामुळे त्यांचे ऑपरेशन खर्च जास्त असतात.
बँका स्वतः कर्ज देण्यासाठी पैसे कुठून आणतात?
त्या ठेवीदारांकडून घेतात (Savings, FD इत्यादी). जर FD वर जास्त व्याज दिलं, तर त्यांचा ‘Cost of Funds’ वाढतो. परिणामी ग्राहकांना दिलेलं कर्ज महाग पडतं.
तुमचा CIBIL स्कोअर जास्त असेल, तर बँक तुम्हाला कमी व्याजदर देऊ शकते.
याशिवाय RBI कडून ठरवलेला Base Rate हे देखील महत्त्वाचं असतं — म्हणजे बँक या दराखाली कर्ज देऊ शकत नाही.
कर्जामध्ये किती बचत होईल हे कसं मोजायचं?
गृहकर्ज ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे — “खरंच किती बचत होणार आहे?” हे मोजणं.
EMI कॅल्क्युलेटर वापरून हे सहज करता येतं. उदाहरणार्थ:
- मूळ कर्ज: ₹५० लाख
- व्याजदर: ९%
- पूर्ण मुदतीत भरावं लागणारं व्याज: ₹५७.९६ लाख
- जर ८.५% दर मिळाला तर उरलेल्या काळात (१३ वर्षं)
- नवीन व्याज: ₹२७.१३ लाख
- जुना उरलेला व्याज: ₹२९.२० लाख
- बचत: ₹२ लाख
पण ही बचत “एकूण खर्च” वजा केल्यावरच खरी ठरते — जसं की प्रोसेसिंग फी, स्टॅम्प ड्युटी इत्यादी.
बॅलन्स ट्रान्सफरचे फायदे
1. व्याजदरात बचत
सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी व्याजदर. जेव्हा नवीन बँक १% किंवा त्याहून कमी व्याजदर देत असेल, तेव्हा हजारो-लाखोंची बचत होऊ शकते.
2. EMI कमी होतो
कमी व्याजदरामुळे तुमचा मासिक EMI देखील कमी होतो. हे तुमच्या मासिक बजेटसाठी फायदेशीर ठरू शकतं.
3. नवीन टेन्युअर निवडण्याची संधी
बॅलन्स ट्रान्सफर करताना तुम्ही तुमच्या कर्जाचा कालावधी (tenure) पुन्हा ठरवू शकता. त्यामुळे EMI आणखी कमी होऊ शकतो. पण लक्षात ठेवा — जास्त कालावधी घेतल्यास व्याज जास्त भरावं लागतं.
बॅलन्स ट्रान्सफरचे तोटे
1. प्रक्रिया वेळखाऊ आहे
नवीन बँकेत कर्ज ट्रान्सफर करताना पुन्हा कागदपत्रांची तपासणी, मंजुरी यासाठी वेळ लागतो. “१० सेकंदात कर्ज ट्रान्सफर” हे फक्त उदाहरणापुरतं खरं असतं.
2. अतिरिक्त खर्च
Loan Processing Fee, Balance Transfer Fee, Stamp Paper Charges अशा अनेक गोष्टींसाठी वेगवेगळा खर्च होतो. ह्या सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.
3. व्याजदर स्थिर राहत नाही
तुम्हाला सुरुवातीला ८.५% व्याजदर मिळाला तरी भविष्यात RBI च्या धोरणांनुसार किंवा बँकेच्या अंतर्गत धोरणांनुसार तो दर वाढू शकतो.
4. इन्शुरन्सचे प्रश्न
कर्ज घेताना काही वेळा बँक तुमचं गृहकर्ज इन्शुरन्ससोबत लिंक करते. बॅलन्स ट्रान्सफर केल्यावर ही लिंक तुटते आणि तुम्हाला नवीन इन्शुरन्स घ्यावं लागू शकतं.
5. मूळ प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सचा धोका
बँक तुमचे मूळ कागदपत्र (original property papers) दुसऱ्या बँकेकडे पाठवते. या प्रक्रियेत ते हरवण्याची (0.1% का होईना) शक्यता असते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
बॅलन्स ट्रान्सफर करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
- ट्रान्सफरची वेळ योग्य असावी — कर्जाच्या सुरुवातीच्या काळात व्याजाचा भाग जास्त असतो, म्हणून ट्रान्सफर केल्यास बचत होते. कर्जाच्या शेवटच्या वर्षांत व्याज कमी असल्यामुळे ट्रान्सफर करून फायदा होत नाही.
- सध्याच्या बँकेशी बोलणं फायद्याचं — नवीन बँकेकडे जाण्याआधीच तुमच्या विद्यमान बँकेला कमी व्याजदर मागून पहा. जर त्यांनी सहमती दिली, तर बॅलन्स ट्रान्सफरची गरजच भासणार नाही.
- EMI आणि खर्चाचा पूर्ण हिशोब करा — केवळ व्याजदरावर नव्हे, तर ट्रान्सफरमुळे होणाऱ्या एकूण खर्चाचा हिशोब मांडल्यावरच अंतिम निर्णय घ्या.
निष्कर्ष
गृहकर्ज ट्रान्सफर हा एक उत्तम पर्याय असू शकतो — विशेषतः जर तुम्ही सुरुवातीच्या वर्षांत आहात आणि कमी व्याजदर मिळत असेल.
पण ट्रान्सफर करताना केवळ “दर कमी आहे” यावर न जाता, संपूर्ण फायदे, तोटे आणि तुमच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून निर्णय घेणे हेच योग्य.
हा लेख उपयुक्त वाटला?
👉 तो शेअर करा मित्र-मैत्रिणींमध्ये — कारण आर्थिक शहाणपण ही एक सामूहिक जबाबदारी आहे!
हे पण वाचा: होम लोनसाठी अर्ज करताय? हे ७ नियम वाचाच – अन्यथा होईल नुकसान!

